मॉन्सून विशेष : कोल्हापूर

posted in: Uncategorized | 0
सागर पाटील 
Saturday, August 18, 2012 AT 07:31 PM (IST)
Tags: सकाळ साप्ताहिक

कोल्हापूर म्हणजे पश्‍चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा. येथील महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा किल्ला ही काही ठिकाणे प्रसिद्ध आहेत; पण पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीने आणखी काही अपरिचित; पण देखणी पर्यटनस्थळे येथे आहेत. त्यांची माहिती.

1. मसाई पठार

यंदाच्या पावसाळ्यात कोल्हापूर, सांगलीकडे जात असाल, तर मसाई पठारावर एक फेरी नक्की मारा. साताऱ्याच्या कास पठाराला आता जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे; पण कोल्हापूरजवळचे हे मसाई पठार अजून प्रसिद्धीच्या झोतात आले नाही. मसाई पठार हे पन्हाळ्याच्या अगदी शेजारीच आहे. या पठाराची सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे याची लांबी आणि रुंदी. संपूर्ण गवताने भरलेले हे पठार आहे. उन्हाळ्यात याचे सौंदर्य पाहण्यापेक्षा पावसाळ्यात हिरवेगार झालेले पठार पाहण्याची मजा औरच!
या पठारावर अनेक प्राणी तुम्हाला पाहायला मिळतील. सापांच्या प्रजोत्पादनासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. अनेक सरपटणारे प्राणी; शिवाय कीटकही येथे दिसतात. हे कीटक आजूबाजूच्या निसर्गाप्रमाणे आपले रंग बदलतात. याच परिसरात जुन्या ऐतिहासिक बौद्धलेण्या आहेत; मात्र त्याबाबतची कोणतीही माहिती तेथे लिखित स्वरूपात नाही. या लेण्या प्राचीन व सुंदर आहेत.

कसे जाणार?
– कोल्हापूरपासून 30 कि.मी. अंतरावर
– अंदाजे 40 मिनिटे वेळ

काय पाहता येईल?
– मसाई देवीचे मंदिर
– प्राचीन बौद्धलेणी
– पन्हाळा किल्ला
– मसाई तलाव

2. राऊतवाडी धबधबा

पावसाळ्यात धबधब्यावर जाऊन भिजायला कोणाला नाही आवडणार? पश्‍चिम घाटातील डोंगरदऱ्यांमधून असंख्य धबधबे आहेत; पण गर्दी, अस्वच्छता आणि दारू पिऊन धिंगाणा करणारी काही मंडळी यांच्यामुळे धबधब्यावर जायला कोणाचे मन तयार होत नाही. कोल्हापूरच्या जवळ असलेला राऊतवाडी धबधबा यापेक्षा वेगळा आहे. कोल्हापूरपासून 54 किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा स्वच्छ व सुरक्षितही आहे. इथे जायला साधारण तास-दीड तासाचा अवधी लागतो. धबधबा छोटासाच, पण खूपच सुंदर आहे. फार उंच नसला, तरीही आपण सुरक्षितता बाळगणे केव्हाही चांगलेच! गर्द हिरव्यागार झाडांच्या मध्ये असल्याने इथे येताना एक मस्त नेचर ट्रेलही अनुभवता येतो. राऊतवाडी धबधब्याच्या वाटेतच राधानगरी डॅम, चक्रेशवानवडी मंदिर (जुनी लेणी असलेले मंदिर), कोकण दर्शन पॉइंट (पश्‍चिम घाटाचा सुंदर नजारा), जिंजी महाल अशी पर्यटनस्थळे आहेत.
कसे जाणार?
– कोल्हापूरपासून 54 कि.मी. अंतरावर
– अंदाजे दीड तास वेळ

काय पाहता येईल?
– राधानगरी डॅम
– चक्रेशवानवडी मंदिर
– कोकण दर्शन पॉइंट
– जिंजी महाल

3. पावनगड

पावनगड हा कोल्हापुरातील पन्हाळ्याप्रमाणेच एक ऐतिहासिक गड. हे ठिकाण फारसे अपरिचित नसले, तरी पावसाळ्यात आवर्जून जावे असे आहे. पंधरा ते वीस फूट उंच असलेला खडबडीत कडा हेच या गडाचे सुरक्षाकवच आहे. काही ठिकाणी कडे मुद्दाम धारदार बनविण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी आणखी सुरक्षेची गरज आहे, त्या ठिकाणी कोल्हापूरच्या काळ्या दगडाची भिंत उभारण्यात आली आहे. 1827 मध्ये हा गड आणि पन्हाळा ब्रिटिशांना देण्यात आला. त्यानंतर काही वर्षांत या गडाची प्रचंड हानी झाली. गडाची दोन प्रवेशद्वारे उद्‌ध्वस्त करण्यात आली. पावसाळ्यात हा किल्ला छान हिरवागार होतो. गडावर पाण्याची सोयही आहे. त्यामुळे इतर वेळीही पाणी उपलब्ध असते.

कसे जाणार?
– कोल्हापूरपासून 30 कि.मी. अंतरावर
– अंदाजे 40 मिनिटांचा वेळ

काय पाहता येईल?
– पन्हाळा किल्ला
– मसाई पठार
– जोतिबाचे मंदिर

4. रामतीर्थ

आजरा तालुक्‍यामध्ये असलेले रामतीर्थ हे पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीने एक उत्तम ठिकाण आहे. तीर्थक्षेत्र असूनही या ठिकाणाला नैसर्गिक संपन्नता लाभली आहे. काही जाणकारांच्या मते, श्रीरामांनी वनवासाच्या काळात या ठिकाणी वास्तव्य केले होते. हे ठिकाण त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे. येथे कॉफीची शेतीही केलेली आहे. या परिसरात जुनी, ऐतिहासिक मंदिरे आहेत.

कसे जाणार?
– कोल्हापूरपासून 85 किमी अंतरावर
– साधारणपणे दीड ते दोन तास वेळ
काय पाहता येईल?
– आंबोलीचा धबधबा
– महादेवगड

आणखी काही पर्यटनस्थळे
1. बर्खी धबधबा – कोल्हापूर शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. हा धबधबा खूप मोठा आहे. धबधब्याच्या मागे असलेले बॅकवॉटरही पाहण्यासारखे आहे.
2. चाळकेवाडी – सातारा जिल्ह्यातील ठोसेघरच्या धबधब्यापासून काही अंतर पुढे गेल्यावर चाळकेवाडी गाव लागते. तिथून पुढे चाळकेवाडीचे पठार आहे. समुद्रसपाटीपासून 3300 मीटर उंचीवर हे पठार आहे. येथे राज्य सरकारने बसविलेल्या अनेक पवनचक्‍क्‍या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *